पुसेगाव – जातिवंत खिलार जनावरांचीच यात्रा म्हणून संपूर्ण राज्यात पुसेगावाच्या श्री सेवागिरी महाराजांची यात्रा ओळखली जाते. यात्रेनिमित्ताने भरवण्यात आलेल्या बैलबाजारात जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार देवस्थान ट्रस्ट आणि बैल बाजार समिती यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतात. जनावरांची खरेदी विक्री बाबत कोणताही अनुचित प्रकार तसेच अनिष्ट गोष्टींना देवस्थान ट्रस्ट व प्रशासन कदापिही थारा देणार नाही, असे मत देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन रणधीर जाधव यांनी व्यक्त केले.
सध्या यात्रेनिमित्त जातिवंत खिलार जनावरांचे प्रदर्शन सध्या सुरू आहे. हजारोंच्या संख्येने खिलार जनावरे यात्रेत दाखल होत आहेत. दररोज खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात जातिवंत खिल्लार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेला हा बैल बाजार ग्रामस्थ व ट्रस्टच्या वतीने सुरळीत चालू आहे.राज्यातील शेतकरी आणि बैलगाडीशर्यत क्षेत्रातील लोकांसाठी ही पर्वणी ठरत आहे.
बाजारातील बैल हे उत्कृष्ट दर्जाचे असल्याने मागणीही चांगली आहे. बाजारात दाखल होणाऱ्या जातिवंत खिलार पशुधनाची संख्या देखील उल्लेखनीय आहे. पशुसंवर्धन विभाग यात सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या अनेक भागांतून शेतकरी तसेच व्यापारी खिल्लार बैल आणि पशुधनाच्या खरेदी-विक्रीसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत. परिणामी यात्रा कालावधीत दहा दिवस भरणाऱ्या या बैल बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.