खंडाळा – केसुर्डी (ता. खंडाळा) येथील औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांच्या प्रदूषणाबाबत काढण्यात आलेल्या अर्धनग्न मोर्चावेळी केसुर्डीचे सरपंच, उपसरपंच आणि काही ग्रामपंचायत सदस्यांवर आर्थिक आरोप करण्यात आले. त्यावरून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य आक्रमक झाले आहेत. मोर्चावेळी केलेले आरोप सिद्ध करून दाखवा, अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा करण्यात येईल, असा इशारा शिरवळ येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.
माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश खडसरे म्हणाले, वास्तविक पाहता प्रदूषणाबाबत अर्धनग्न मोर्चा काढताना संबंधितांनी ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही की पूर्वसूचना दिली आर्थिक बाबीत संबंधित कंपन्यांशी ग्रामपंचायतीचा काडीमात्र संबंध नसताना, ग्रामपंचायतीवर केलेले आरोप बिनबुडाचे, सवंग लोकप्रियतेसाठी आणि स्वतःच्या फायद्याकरिता करण्यात आले आहेत. अशी नाहक बदनामी ग्रामपंचायत खपवून घेणार नाही. या आरोपांबाबत संबंधितांनी तीन दिवसांत पुरावे सादर करावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ओरिएंटल ईस्ट कंपनीमुळे पसरणार्या दुर्गंधीबाबत ग्रामपंचायतीकडून कंपनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. इलजिन ग्लोबल इंडिया कंपनीच्या प्रदूषणाबाबत माती परीक्षण केले असता सकारात्मक निकाल आले आहेत. याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुरेखा ढमाळ, उपसरपंच सोनाली चव्हाण, माजी सरपंच गणेश ढमाळ, माजी उपसरपंच आनंदा ढमाळ, सूर्यकांत चव्हाण, रवींद्र ढमाळ, विश्वास ढमाळ, संतोष ढमाळ आणि असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.