सातारा – सातारा- जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मतदारसंघात दि. २८ ते दि. ३० मार्च असे सलग तीन दिवस विविध समाजोपयोगी उपक्रम आणि कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाल्यामुळे संपूर्ण मतदारसंघ शिवेंद्रसिंहराजेमय झाला. आ. शिवेंद्रसिंहराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर आज शनिवार दि. ३० रोजी सायंकाळी जनसागर उसळला. सातारा आणि जावळी तालुक्यातील जनतेसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील जनतेने आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि सदिच्छा कायम पाठीशी राहू द्या. केव्हाही हाक द्या, तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध आहे, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजेंनी जनतेला दिला.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल सुरु होती. सकाळी केसरकर पेठेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर, जिल्हा बँकेच्या सभागृहात बँक कर्मचाऱ्यांच्यावतीने चांदीची तलवार भेट देवून वाढदिवस साजरा करण्यात आला. वळसे येथे बैलगाडा शर्यतीला मोठा प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ५ वाजता मेढा येथील वसंतगडावर जावळीतील जनतेच्यावतीने आ. शिवेंद्रसिंहराजेंचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यांनतर रात्री ढोणे कॉलनीत महिलांसाठीचा लकी ड्रा, विलासपूर येथे महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम झाला. रात्री शाहू स्टेडियम येथे क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना, रात्री १२ नंतर पोवई नाका, शाहू चौक, तालीम संघ चौक, कमानी हौद, गोल बाग चौक आदी ठिकाणी केक कापण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत तरुणाई वाहत होती. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, विद्युत रोषणाईने अवघे शहर उजळून निघाले.
शनिवारी वाढदिवशी आज सकाळपासूनच सुरुचीवर जनसागर उसळला होता. सकाळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी चिमणपुरा पेठेतील गारेच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कै. भाऊसाहेब महाराज यांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले. भवानी मातेचे दर्शन घेतले. कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉलमध्ये मंगलमूर्ती हॉस्पिटलच्यावतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात माउली ब्लड बँकेच्यावतीने रक्तदान शिबिर, वळसे येथील एहसास मतिमंद मुलांच्या वसतिगृहात मिष्टान्न वाटप आणि एअर कुलर भेट देण्यात आला. पोगरवाडी येथे तसेच गोडोली येथे रक्तदान शिबिराचे उदघाटन आदी कार्यक्रम उत्साहात झाले. याशिवाय मातोश्री वृद्धाश्रम, आशा भवन (सकाळी व संध्याकाळी), आंनदाश्रम, रिमांड होम, बेगर्स होम, लक्ष्मीबाई पाटील मुलींचे वसतीगृह, कब्रस्थान मदरसा, स्नेह निकेतन मतिमंद मुलींचे बालगृह, दारुल उलुम हुसेनी या मोळाचा ओढा, शाहू बोर्डिंग धनिणीची बाग, आर्यांग्ल हॉस्पिटलमधील रुग्ण आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना (सकाळ आणि संध्याकाळ) आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले.
कला व वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर आज सायंकाळी ६ पासूनच आ. शिवेंद्रसिंहराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी जमू लागली. आ. शिवेंद्रसिंहराजे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि जोरदार फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली. कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भव्य स्टेजवर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शुभेच्छांचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. शहर आणि उपनगरातील नागरिकांचे जथ्थे कार्यक्रमस्थळी दाखल होऊ लागले.
दोन्ही तालुक्यांतील कार्यकर्ते आणि शिवेंद्रसिंहराजेप्रेमी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिंहराजेंचा जयजयकार करत कार्यकर्ते आणि नागरिक आ. शिवेंद्रसिंहराजेंना शुभेच्छा देत होते. सायंकाळी आठच्या सुमारास मैदान खचाखच भरून गेले. आबालवृद्धांसह अवघा जनसागर आ. शिवेंद्रसिंहराजेंना शुभेच्छा देण्यासाठी लोटला होता. त्यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी लोकांची झुंबड उडत होती. रात्री उशिरापर्यंत आ. शिवेंद्रसिंहराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार, विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी शिवेंद्रसिंहराजेंना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.