सातारा – प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत शासकीय ऑडिटर, रिझर्व बँकेच्या सूचना व सभासदांची मागणी डावलून मनमानी कारभार केला जात असल्याच्या निषेधार्थ शिक्षक समितीचे सदस्य व प्राथमिक शिक्षक नितीन बबनराव करे यांनी दि. २५ डिसेंबर पासून शिक्षक बँकेसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा एका पत्रकाद्वारे दिला आहे. शिक्षक बॅंक एकाच सत्रात चालवावी, अशी त्यांची मुख्य मागणी असून याबाबतचे निवेदन त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात दिले आहे.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या कारभाराबाबत नितीन करे यांनी चिंता व्यक्त केली असून ढिसाळ व विस्कळीत कारभारामुळे बँकेची थकबाकी कोट्यवधी रुपयांनी वाढल्याचा आरोप केला आहे. शिक्षक बँकेच्या जिल्ह्यात एकूण १३ शाखा असून यापैकी सात शाखा या दोन सत्रात सुरू आहेत. हा विषय दि. २८ नोव्हेंबर २०२३ च्या संचालक मंडळाच्या सभेच्या विषय पत्रिकेत विद्यमान चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी घेतला होता. परंतु शिक्षक समितीच्या काही संचालकांनी नवीन नोकर भरती करण्याच्या उद्देशाने याला विरोध केल्यामुळे हा विषय तहकूब करण्यात आला.
वास्तविक रिझर्व बँकेने केलेल्या तपासणीत सर्व शाखा एकाच सत्रात सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बँकेच्या कार्यालयीन टिपणी मध्येही सर्व शाखा एकाच सत्रात कराव्यात, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र तरीही संचालक मंडळ हा विषय टाळत आहे. या गचाळ कारभारामुळे रिझर्व बँकेने शिक्षक बँकेला लाखोंचा दंड केला असल्याचा आरोप करे यांनी निवेदनात केला आहे.
दि. २४ डिसेंबर रोजी बँकेच्या संचालक मंडळाची सभा होणार असून सर्व शाखा एकाच सत्रात सुरू करण्याचा विषय मंजूर न झाल्यास दि. २५ पासून बँकेच्या मुख्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे नितीन करे यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हा उपनिबंधक व संबंधित विभागांना पाठवल्या आहेत. दरम्याान बँकेत समिती व शिक्षक संघ अशी एकत्रित सत्ता असतानाही करे यांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.