सातारा – शाहूपुरी परिसरातील जिल्हा परिषद कॉलनी, खटावकर कॉलनी, धर्मवीर संभाजीनगरसह परिसरात घबराट निर्माण करणा-या वानरांच्या टोळीतील त्रास देणारया वानराला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाच्या रेस्क्यू टिमला यश आले.
या वानराने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. दोन जणांचे चावेही घेतले होते. यशवंतनगर येथे शनिवारी कचरा संकलन करणाऱ्या नगरपालिका ट्रॅक्टरवर वानर बराच वेळ बसून राहिले होते. ही माहिती यंत्रणेला मिळताच या ठिकाणी त्यांनी धाव घेतली. सर्वोदय कॉलनीच्या रस्त्यावर वानराला भुलीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात रेस्क्यू टिमला यश आले. वानराच्या उपद्रवाबाबत तक्रार केल्यापासून वन विभागाने केलेल्या प्रयत्नामुळेच हे शक्य झाले आहे. नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन भारत भोसले यांनी केले आहे.