साताऱ्यात एकाला अटक; 87 किलो चंदन व 600 मोरपिसे जप्त
सातारा – सातारा वन विभागाने सातारा व कराड शहरात पूजा साहित्य विक्री करणाऱ्या सहा दुकानांवर कारवाई करून 87 किलो चंदन, सहाशे मोरपीसे व इंद्रजाल नावाचा दुर्मिळ सागरी जीव या कारवाईत जप्त केला. या तस्करीमागे आंतरराज्य टोळी असल्याचा वन विभागाचा संशय असून याच धर्तीवर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातही छापे टाकण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार साताऱ्यात दत्त पूजा भांडार, पंचमुखी पूजा साहित्य व शाहू स्टेडियममधील कोटेश्वर पूजा साहित्य तसेच कराडमधील तीन संशयित दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. दत्त पूजा भांडारचा मालक संतोष लक्ष्मण घोणे याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने दोन दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. घोणे याच्याकडून 87 किलो चंदन व सहाशे मोरपिसे आढळून आली.
पंचमुखी पूजा साहित्य या दुकानाचे मालक दत्तात्रय धुरपे यांच्याकडून साडेआठ किलोचे चंदनाचे तुकडे जप्त करण्यात आले. कोटेश्वर पूजा साहित्यचे राहुल विजय निकम याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे घोरपड प्राण्याच्या शरीराचा भाग (हत्ता जोड) असलेले नऊ अवशेष व मोरपिसे आढळून आली. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व जैवविविधता कायदा 2002 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मोहिते म्हणाले, “या प्रकरणामागे आंतरराज्य टोळी असल्याचा संशय आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे झालेल्या वन विभागाच्या धडक कारवाईचे समान संदर्भ तपशीलामध्ये तपासले जात आहेत. या प्रकरणाचे आणखी काही नवीन धागेदोरे पुढे येण्याची शक्यता आहे.’
उपवनसंरक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले, सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, वनपाल प्रशांत पडवळ, वनरक्षक सुहास भोसले, साधना राठोड, राजू मोसलगी, अशोक मलप, सूर्याजी ठोंबरे, सुरेश गभाले, संतोष दळवी यांनी कारवाईत भाग घेतला होता.
कराडमध्ये दोन विक्रेत्यांना अटक
कराड (प्रतिनिधी) –कोल्हापूर वन विभागाने वन्यप्राण्यांची शिकार आणि त्यांच्या अवयवांची तस्करी केल्याप्रकरणी दोन विक्रेत्यांना अटक केली आहे. कराड शहरातील गुरूवार पेठेतील विजय बाबुराव ऍण्ड सन्स या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी दुकानात इंद्रजालचे 11 नग, हत्ताजोडीचे 7 नग आणि साळशिंगचे 6 नग आढळून आले. वन विभागाच्या पथकाने मुद्देमाल जप्त करुन दुकान मालक विजय बाबुराव धावडे (वय 52, रा. गुरूवार पेठ) याला अटक केली. त्यानंतर नजीकच असणाऱ्या प्रशांत जनरल ऍण्ड पूजा भांडार या दुकानावरही छापा टाकण्यात आला. त्यावेळी दुकानात इंद्रजालचे 8 नग, हत्ताजोडीचे 11 नग आणि साळशिंगचे 17 नग आढळून आले. हा मुद्देमालही जप्त करुन दुकान मालक प्रवीण देशमुख (वय 39, रा. गुरूवार पेठ) याला अटक करण्यात आली. या तस्करीत आणखी काहीजणांचा हात असण्याची शक्यताही सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी व्यक्त केली. दरम्यान, कराडमधील निर्मल ट्रेडर्स या दुकानावरही वनविभागाने छापा टाकला. या दुकानात दोन पाकीट बेहडा कवच, 43 पाकीटे शिकेकाई, 8 पाकीट डिंक, 12 पाकीट कोळसा, 4 पाकीट मुसळी, 12 पाकीट गुगल डिंक, 103 नग चंदन आढळून आले. विनापरवाना बेकायदेशिररीत्या ही वनोपज जवळ बाळगल्याप्रकरणी दुकान मालक महेश राजू शेटे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.