सातारा: कृष्णा हॉस्पिटलला पाच व्हेंटिलेटर प्रदान

कराड (प्रतिनिधी) – करोनाग्रस्त रूग्णांची वाढती संख्या आणि त्यांच्यावरील उपचारासाठी आवश्‍यक भासणाऱ्या व्हेंटिलेटरचा तुटवडा लक्षात घेत, कराडवासियांच्या मदतीसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील पुढे सरसावले आहेत. त्यांच्या पुढाकारातून संवेदना फाऊंडेशनच्या वतीने कृष्णा हॉस्पिटलला नुकतीच 5 व्हेंटिलेटर मशिन प्रदान करण्यात आली आहेत. या नव्या व्हेंटिलेटर मशिनचा लाभ करोनाग्रस्त रूग्णांना होणार आहे.

कराड तालुक्‍यात करोनाबाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तालुक्‍यातील कृष्णा हॉस्पिटलसह अन्य काही रूग्णालयात करोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू असून, सर्व बेड फुल्ल आहेत. विशेषत: ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटर बेडचा मोठा तुटवडा जाणवत आहे. व्हेंटिलेटर अभावी अनेक रूग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत, कृष्णा हॉस्पिटलला 5 व्हेंटिलेटर मशिन प्रदान करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार संवेदना फाऊंडेशनच्यावतीने कृष्णा हॉस्पिटल प्रशासनाकडे 5 व्हेंटिलेटर मशिन सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कुलसचिव एस. ए. माशाळकर, राजेंद्र संदे, तुषार कदम, डॉ. व्ही. सी. पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.