कराड – चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने एका दांपत्याने 23 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. दुकान गाळे भाड्याने घेत ई- स्टोअर कंपनीचे किराणा बझार सुरू करून त्यात गुंतवणूक करण्यास सांगत ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सोमवार, दि. 16 रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक बाबूराव पाटील (रा. आगाशिवनगर- मलकापूर) यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. तर अरुण रोकडे व त्यांची पत्नी धनश्री रोकडे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, अरुण रोकडे व अन्य एका व्यक्तीने अशोक पाटील यांचे दुकान गाळे भाड्याने घेत त्यामध्ये ई-स्टोअर किराणा बाजार सुरू केला होता.
या स्टोअरमध्ये 25 लाखांची गुंतवणूक करा. त्या बदल्यात महिन्याला एक लाख रुपये असे 35 महिन्यात 35 लाखांचा परतावा देऊ, असे रोकडे याने पाटील यांना सांगितले होते. तसेच ई- स्टोअरमध्ये रोजच्या विक्रीच्या पाच टक्क्यांप्रमाणे अधिक पैसे देण्याची ग्वाही पाटील यांना दिली होती. त्यानुसार अशोक पाटील यांनी रोकडे यांनी सांगितलेल्या बॅंक खात्यावर वेळोवेळी 25 लाख रुपये जमा केले. त्यानंतर दुकान गाळ्यांचे भाडे आणि अशोक पाटील यांना देण्यात येणारी रक्कम काही महिन्यांनी बंद करण्यात आली. चेक देतो, नोटरी करून देतो, असे लेखी देऊनही 23 लाख 60 हजार रुपये दिले नाहीत. त्यामुळे अशोक पाटील यांनी पोलिसात धाव घेत रोकडे दांपत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.