महाराष्ट्र शासन आयोजित हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या तिसऱ्या दिवशी सातारा उपकेंद्रावर सातारच्या आझाद हिंद प्रतिष्ठानने चैतन्य सरदेशपांडे लिखित आणि नील केळकर दिग्दर्शित “एक्सपायरी डेट’ या नाटकाचा प्रयोग सादर केला. आज-कालच्या जमान्यात प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्यात धन्यता मानणाऱ्या नवीन पिढीने मृत्यूचा देखील इव्हेंट केल्याने निर्माण होणारी परिस्थिती लेखकाने रंगवली आहे. या नाटकाची संहिता अतिशय दमदार आहे. आपल्याकडे होणाऱ्या वास्तुशांत, लग्न, बारसे या विविध कार्यांचा मुहूर्त पाहून निमंत्रण पत्रिका काढल्या जातात. तसेच मृत्यूचीदेखील दिनांक वेळ, शोधून, त्याच्या पत्रिका काढून, लोकांना निमंत्रण देऊन मोठा इव्हेंट केला जातो. त्यातून मग पुढे जे घडते, ते प्रसंग “एक्सपायरी डेट’ या नाटकात बेमालूम गुंफले आहेत.
दुसऱ्यांच्या अंत्ययात्रेच्या इव्हेंटमध्ये नाचणाऱ्या नानांची “एक्सपायरी डेट’ काढायचा निर्णय त्यांचा परदेशात वास्तव्यास असलेला मुलगा घेतो. त्याला नाना विरोध करतात; परंतु शेवटी परदेशात असलेल्या मुलाच्या सोयीसाठी आणि बायकोच्या आग्रहाखातर ते स्वत:ची एक्सपायरी डेट काढायला तयार होतात. मग, नानांची एक्सपायरी डेट जवळ आली की ते नाराज होतात आणि आपल्या मृत्यूचा इव्हेंट होऊ नये, म्हणून निराश मनाने प्रयत्न करतात.
शेवटच्या क्षणी संपूर्ण आयुष्याचा ताळमेळ मांडताना, बायको, मुलांसाठी केलेला त्याग बोलून दाखवतात; परंतु नाना सोडून बाकी सर्व जण नाना आपल्यातून कायमचे निघून जाणार, म्हणून त्या दिवसाची जोरदार तयारी करतात. त्यांच्या एक्स्पायरी डेटच्या निमंत्रण पत्रिका काढून वाटल्या जातात. नानांचा मृत्यू होण्याच्या दिवशी कुटुंबीय, नातेवाइक, निमंत्रण दिलेले लोक एकत्र येतात आणि नाना जाण्याच्या काढलेल्या वेळी वाट बघू लागतात. पत्रिकेत दिलेल्या वेळेत बरोबर नानांना हार्टऍटॅक येतो; परंतु त्यातून नाना वाचतात आणि पुन्हा एकदा दुसऱ्याच्या अंत्ययात्रेत डीजेवर नाचायला तयार होतात. समोर आलेल्या परिस्थितीला आनंदाने सामोरे जातात, हा या नाटकाचा विषय आणि आशय. यामध्ये नाना हे मध्यवर्ती पात्र दिग्दर्शक नील केळकर यानेच साकारले.
सुखदा कुलकर्णीने नानांच्या बायकोचे पात्र छान रंगवले. अक्षय ढमाळ यांचा मॅनेजरही छानच. समृद्धी साळुंखे, आदेश कुलकर्णी, प्रथमेश देशपांडे, क्रिश उधानी, पुष्कर दळवी अथर्व हेंद्रे, ओम काळेकर यांनी इतर पात्रे ठीकठाक साकारली. तांत्रिक बाजूंमध्ये इशान केसकरची प्रकाश योजना आणि मंजिरी मोघे हिचे पार्श्वसंगीत ठीक.
शुभम मोरेचे नेपथ्य, नैना आफळे आणि प्राजक्ता चव्हाण यांची रंगभूषा, वेशभूषा उत्तम. दिग्दर्शक नील केळकरने नव्या टीमला घेऊन “एक्सपायरी डेट’ सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावणाऱ्या संहितेचे सादरीकरण करताना, अभियन अजून चांगला हवा होता. त्यात सर्व कलाकार थोडे कमी पडले, असे म्हणावे लागेल. आता उद्या (शुक्रवार, दि. 24) कुसवडे येथील जागृती नाट्य कलामंच या संस्थेचा “आम्ही दोघेच राहायचो घरात’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा.
– नीतिराज देशमाने
अनेक अपघात घडलेत तरीही….
या सर्व्हिस मार्गांवरून ज्यावेळी वाहने प्रमुख मार्गावरती येतात. त्यावेळी वाहने वेगात असतात. त्यामुळे बरेच अपघात झाले असून लोकांनी आपला जीव गमावला आहे. या सर्व प्रकरणामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रोडचे दुभाजक फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल संबंधितावर गुन्हा कोण दाखल करणार असा प्रश्न जनसामान्य व प्रवाशांमधून उपस्थित होत आहे ? सातारा ते खंबाटकी बोगदा व उंब्रजपर्यंत महामार्गावर अशा प्रकारे दुभाजक फोडण्यात आलेले असून यावर कडक कारवाई अपेक्षित आहे.