सातारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेनुसार सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हा अध्यक्षपदी डॉ. सुरेश सर्जेराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद दीर्घकाळापासून रिक्त होते. लवकरच जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती होईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते.
डॉ. सुरेश जाधव काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून यापूर्वी खटाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने त्यांनी निवडणूक लढवली होती. पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर विधायक कामे केली आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्षाला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे डॉ. जाधव यांनी ‘प्रभात’ ला सांगितले.