सातारा – जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उद्या, दि. 15 मतदान होणार आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतदान यंत्रांची तपासणी गुरुवारी करण्यात आली. जिल्ह्यात दोन हजार 38 मतदान केंद्रांवर 19 हजार 437 कर्मचारी तैनात असून मतदानाचे साहित्य घेऊन हे कर्मचारी गुरुवारी रवाना झाले. मतदान केंद्रांवरील तयारीही पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 223 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, तीन ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्जच दाखल झालेले नाहीत. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना बुधवारी (दि. 13) प्रशिक्षण देण्यात आले. मतदानासाठी दोन हजार 38 पोलीस नेमण्यात आले आहेत.
महसूल अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर गेलेले कर्मचारी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवतील. मतदानादिवशी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर “मॉक पोल’ घेतला जाईल. त्यानंतरच प्रत्यक्षात मतदान सुरू होईल.
या प्रक्रियेसाठी 401 निवडणूक निर्णय अधिकारी, 598 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 124 क्षेत्रीय अधिकारी, 2038 मतदान केंद्राध्यक्ष, 6014 मतदान कर्मचारी, 2038 शिपाई, 2322 आशा व अंगणवाडी सेविकांची नेमणूक करण्यात आली आहे.