सातारा – उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (एमसीसीआयए) तर्फे दिल्या जाणार्या विविध पुरस्कारांमध्ये ‘व्यावसायिक सामाजिक जबाबदारी’ (सीएसआर) अंतर्गत विशेष पुरस्काराने सातारच्या कूपर कॉर्पोरेशनला नुकतेच सन्मानित करण्यात आले.
‘एमसीसीआयए’च्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी यांच्या हस्ते पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात नुकतेच झाले. याप्रसंगी ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष दीपक करंदीकर आणि महासंचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते. नावीन्य, नवीन उत्पादने आणि सेवांचा व्यावसायिक वापर, उद्योजकता, एमएसएमई युनिट्सद्वारे संरक्षण उत्पादन, व्यावसायिक सामाजिक जबाबदारी, हरित उपक्रम यासाठी ‘एमसीसीआयए’तर्फे पुरस्कार दिले जातात.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध श्रेणींमध्ये अनेक कंपन्यांना पुरस्कार देण्यात आले. ‘व्यावसायिक सामाजिक जबाबदारी’ या श्रेणीतील पुरस्करांसाठी अंतिम फेरीत पाच कंपन्यांना सादरीकरणासाठी बोलावण्यात आले होते. ‘सीएसआर’ कायदा येण्यापूर्वीपासूनच, कूपर उद्योग समूहाने उद्योगाची नाळ समाजाशी बांधलेली आहे. कूपर उद्योग समूहाची ही 100 वर्षांची परंपरा आहे. याची दखल घेऊन कूपर कॉर्पोरेशनला 2023 या वर्षासाठी विशेष पुरस्कार देण्यात आला. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक फरोख कूपर आणि नितीन देशपांडे (सीएचआरओ) यांच्या मार्गदर्शनाखाली कूपर उद्योग समूहाच्यावतीने सामाजिक दायित्व योजनेंतर्गत विविध घटकांना मोठी मदत करण्यात आली आहे.
सातारा सैनिक स्कूलमध्ये सर्व क्लासरूम डिजिटाइज करणे, विस्तृत ग्रंथालयाची उभारणी, सातारा जिल्हा कारागृहात कैदी सुधारणा केंद्र या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात, आपत्कालीन पूर स्थितीत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप, कोविड19 काळात शासनास नाममात्र एक रुपया भाड्याने एक कोटी रुपयांचे जनसेट पुरवले, होमाई कूपर ग्रंथालयामार्फत खेड्यातील विविध शाळांना मोफत ग्रंथालयांचे वाटप, मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरांचे आयोजन, 100 पेक्षा जास्त हृदयरोगी मुलांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक मदत, अशी अनेक सामाजिक कामे कूपर उद्योग समूहाने केली आहेत. सामाजिक दायित्वाच्या प्रत्येक कार्यक्रमात कंपनीच्या कर्मचार्यांचा सक्रिय सहभाग असतो.