कराडकरांसाठी उपलब्ध केले दुसरे ऑक्सिजन मशिन
कराड (प्रतिनिधी) – कराडमध्ये ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने प्रभाग सातचे नगरसेवक हणमंतराव पवार व आल्हाद मंडळाने गत महिन्यात शहरातील पहिली पोर्टेबल ऑक्सिजन मशिन घेतली होती. या मशिनच्या उपयोगानंतर अजूनही मागणी वाढल्याने दुसरी ऑक्सिजन पोर्टेबल मशिन घेण्यात आली. या मशिनचे लोकार्पण नुकतेच झाले.
नगरसेवक हणमंतराव पवार, दक्ष कराडकरचे प्रमोद पाटील व अमित पाटणकर यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष अमोल पवार, उपाध्यक्ष नंदकुमार पवार तसेच मंडळाचे कार्यकर्ते सुशिल लावंड, श्रीकांत घोडके, रोहित नलवडे, अजय वसगडेकर, रोहन विभूते, अबिद शेख, गणेश देवकर व कोव्हिड योद्धा गणेश पवार उपस्थित होते. यावेळी नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कराडमध्ये करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्यानंतर ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होऊ लागला. त्यावेळी पोर्टेबल ऑक्सिजन मशिनची गरज ओळखून सर्वप्रथम नगरसेवक हणमंतराव पवार मित्रमंडळ व आल्हाद मित्रमंडळाने पहिली पोर्टेबल ऑक्सिजन मशिन कराडकरांसाठी उपलब्ध केली होती. नंतरच्या काळात शहरात अनेक संस्था व नगरसेवक तसेच संघटनांनी ऑक्सिजन मशीन खरेदी करून त्या नागरिकांसाठी उपलब्ध केल्या आहेत.
दरम्यानच्या काळात आणखी मागणी वाढल्याने हणमंतराव पवार व आल्हाद मित्र मंडळाने दुसरी पोर्टेबल मशिन खरेदी करत ती नागरिकांसाठी रुजू केली. प्रभाग 7 मध्ये आरोग्य सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा किट देऊन सन्मान करण्यात आला.