सातारा – हिट ॲन्ड रन प्रकरणी जिल्हयात कोठेही वाहनांची अडवणूक केली जात असल्यास त्याची माहिती वाहतूक चालकांनी पोलीस प्रशासनास तात्काळ द्यावी. सदयस्थितीत केंद्र शासनाने हिट ॲन्ड रन प्रकरणी नवीन कायदयाची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. त्यामुळे कोणीही अत्यावश्यक सेवेतील एलपीजी, डिझेल व पेट्रोल पुरवठा करणाऱया वाहनांची व चालकांची अडवणूक करू नये. अन्यथा अशी अडवणूक करणा-या संबधितांवर पोलीस विभागाकडून गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
केंद्र शासनाने हिट ॲन्ड रन प्रकरणी नवीन कायदयाची अंमलबजावणी सुरू केलेली नसतानाही काही लोकांकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून आंदोलन सुरू केल्याने व वाई एमआयडीसीतील बीपीसीएल एल.पी.जी. बॉटलींग प्लाँन्ट परिसरात निदर्शने केल्याची बाब निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. पी. भुजबळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, एलपीजीचे सेल्स ऑफीसर प्रशांत पटेल, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे प्रभात कुमार, पेट्रोल पंप चालक संघटनेचे अध्यक्ष रितेश रावखंडे, जिल्हा पेट्रोल वितरक संघटनेचे अध्यक्ष विपुल शहा आदी उपस्थित होते.
जिल्हयातील सर्व ट्रान्सपोर्टस व चालकांच्या पाठीशी प्रशासन असून त्यांना जिल्ह्यात कोठेही अडचण आल्यास तात्काळ महसूल व पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही श्री. डुडी यांनी केले.