आ. रामराजे; शरद पवार यांनी तालुक्यावर आणि माझ्यावर केलेले उपकार विसरणे अशक्य
फलटण – फलटण तालुक्यात मी विकासाचे राजकारण केले. सध्या तालुक्यातील राजकीय संस्कृती बिघडत चालली असून, दहशतीचा वापर होत आहे. शरद पवार यांचे या तालुक्यावर आणि माझ्यावर अनंत उपकार असतानाही, कार्यकर्त्यांना दहशतीपासून वाचवण्यासाठी त्यांना दुखावणारा वेगळा राजकीय निर्णय घ्यावा लागला, असे विधान परिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
कोळकी, ता. फलटण येथील पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण आणि नवीन विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, पुंडलिक नाळे, सचिन रणवरे, कोळकीच्या सरपंच स्वप्ना कोरडे, उपसरपंच विकास नाळे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. रामराजे म्हणाले, अशक्यप्राय असलेला धोम बलकवडी प्रकल्प शरद पवार यांच्यामुळेच पूर्णत्वास गेला. एवढेच नव्हे तर तालुक्यातील अनेक कामे त्यांच्यामुळेच मार्गी लागली.
माझ्यासह तालुक्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत. येथील विकासावर त्यांचीच छाप आहे. त्यांचे उपकार विसरू शकत नाही. राज्यात सरकार बदलल्याने अनेक कामांवर निर्बंध घातले होते. कामे रखडली होती. ती कामेही मार्गी लावणे आवश्यक होते. त्यातच तालुक्यात राजकीय दहशत वाढू लागली होती. ही दहशत वाढू नये यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. सातारा जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, मालोजीराव नाईक निंबाळकर यांचा सुसंस्कृत राजकीय वारसा आहे.
तो आपल्याला पुढे न्यायचा आहे; परंतु जिल्ह्याचे नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचे, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. जिल्ह्याचे नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हाती जाऊ नये, यासाठी ही धडपड आहे. जिल्ह्यात आणि तालुक्यात आपल्याला सावधपणे राजकीय पावले टाकावी लागणार आहेत. सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे विरोधकांशी तडजोड करायची का, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाड्या टिकत नाहीत आणि यशस्वीही होत नाही. काहीही झाले तरी फलटणच्या राजकारणात तडजोड करणार नाही. इथले राजकारण आपल्याच पद्धतीने करणार आहोत. मी मोठ्या मेहनतीने इथे विकासाचे राजकारण केले. विकासाची ही दिशा भविष्यातही कायम राहील. विकासकामे करणे हीच माझी “जात’ आणि तोच “धर्म’ आहे. तो मी शेवटपर्यंत निभावणार आहे.