सातारा – ‘आपले गुरूजी ’ या नावाने वर्गात संबंधित शिक्षकांचा फोटो लावावा याबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आदेश दिले दिल्यानंतर सातारा जिल्ह्यातील ४६८ प्राथमिक शाळांत गुरूजींचें फोटो झळकले आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच सर्व शाळांमध्ये या उपक्रमाची अंंमलबजावणी होणार आहे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक वर्गात स्वत: उपस्थित न राहता इतर कोणालाही पाठवत असल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या होत्या. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचे आदेश दिले होते. सरकारी शाळांमधील अनेक शिक्षक पगार सरकारचा आणि काम दुसऱ्याचे करत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. ग्रामीण भागात तर जिल्हा परिषद शाळांमधील बहुतांश शिक्षक शाळेकडे फिरकत नसल्याचे आढळले. तर काही ठिकाणी तर नाममात्र वेतनावर परस्पर आपल्या जागी एखाद्या व्यक्तीची शिक्षक म्हणून नियुक्ती करीत सरकारकडू्न मात्र चांगला पगार घेणाऱ्या शिक्षकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे या शिक्षकांना शिस्त लागण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला.
शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना निर्माण व्हावी या हेतूने ‘आपले गुरूजी’ अभियान राबविण्यात येणार आहे.यामुळे आपल्यासाठी शासनाने कोणते शिक्षक नियुक्त केले आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, बोगस शिक्षक कोण हे माहीत व्हावे यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे दांडी बहाद्दर शिक्षकांनासुध्दा चाप लागलार आहे. सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये या निर्णयाची अमंलबजावणी करून किती शिक्षकांची छायाचित्रे वर्गात लावण् लावण्यात आली याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मागवली होती, त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सुमारे ४६८ गुरूजींची छायाचित्रे वर्गात झळकू लागली आहेत.
काही तालुक्यातील प्राथमिक शाळेत आपले गुरूजी या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र ज्या शाळेत अद्यापही शिक्षकांची छायाचित्रे लावण्यात आली नाहीत त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होइल.
– शबनम मुजावर (शिक्षणाधिकारी प्राथमिक)