सातारा – सातारा तालुक्यातील निगडी, वर्णे, देवकरवाडी, राजेवाडी येथील पीडित शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध दर्शवला असून भूमीपूत्र सेवाभावी शेतकरी संघटना, सातारा निगडी तर्फ सातारा संस्थेच्या वतीने देगाव फाटा येथे आज रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
निगडी, वर्णे, देवकरवाडी, राजेवाडी गावातील जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी संपादित करणेकामी अधिसूचना जारी केली असून महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने आमच्या सातबारा वरती आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देताच अनधिकृतपणे नोंदी केल्या आहेत. तसेच सन २०१३ पासून आजपर्यंत सन २०२३ पर्यंत १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
त्याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे हरकत घेतलेली असून त्याकामी कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. १४ जुलै २०२३ रोजी मौजे निगडी, धनगरवाडी, वर्णे, जाधववाडी व राजेवाडी या गावातील पीडित शेतकऱ्यांनी शांतताप्रिय मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊ असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते. पण तो निर्णय आजपर्यंत आम्हाला मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रशासनाबद्दल तीव्र आक्रोश आहे. त्यामुळेच सर्व पीडित शेतकरी आज सकाळी ११ वा. देगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको व धरणे आंदोलन करणार आहे.