सातारा, – जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा जाणवू लागला असून दोन दिवसात 39 करोना बाधित आढळून आले आहेत. फलटण, कराड व सातारा तालुक्यात बाधितांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क बंधनकारक केले आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सोमवारी एका दिवसात 24 बाधित आढळून आले असून कराड तालुका 6, फलटण 6, सातारा 5, जावळी, खंडाळा, कोरेगाव, माण, पाटण, वाई व इतर असे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी फलटण तालुका 6, कराड 4, कोरेगाव 1, सातारा 1, वाई 1, जावळी 1 असे 15 बाधित आढळून आले आहे. दोन दिवसांत 39 बाधित आढळले आहेत. गेल्या दोन दिवसांत एकाही बाधिताचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.