जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे आंबेगाव तालुक्यात खळबळ
मंचर – पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील सरपंच अनिल वाळुंज यांना तिसरे अपत्य आणि पारगांव (ता. आंबेगाव) येथील सरपंच बबन ढोबळे यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सरपंचपदासाठी अपात्र ठरविल्याचा आदेश दिला आहे. तालुक्याच्या पूर्वभागात लागोपाठ दोन गावांच्या सरपंचांचे पद गेल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
पारगाव येथील सरपंच बबन नामदेव ढोबळे यांच्या आई लक्ष्मीबाई नामदेव ढोबळे (एकत्र कुटुंब) यांनी त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक 1207 लगतच्या शासकीय गायरान गट क्रमांक 1055 मध्ये अतिक्रमण केले असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बबन ढोबळे यांना अपात्र ठरवावे, अशी तक्रार दीपक लक्ष्मण ढोबळे यांनी जिल्हा धिकाऱ्यांकडे केली होती. त्यासंदर्भात दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आणि पुरावे तपासून जिल्हा अधिकारऱ्यांनी बबन ढोबळे हे सरपंच, तसेच सदस्यपदी राहण्यास अपात्र असल्याचा निकाल शनिवार (दि. 1) रोजी दिला आहे.
याबरोबरच पोंदेवाडीचे सरपंच अनिल किसन वाळुंज यांना तिसरे अपत्य असून त्यांना अपात्र ठरवावे, अशा प्रकारे बबन नामदेव वाळुंज व नारायण महादेव हारके यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. जिल्हा अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून आणि पुरावे तपासून जिल्हा अधिकाऱ्यांनी अनिल वाळुंज यांना सरपंच, तसेच सदस्यपदी राहण्यास अपात्र असल्याचा निकाल बुधवार (दि. 29) रोजी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी माझी बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी न देता निकाल दिला आहे. याबाबत मी आयुक्तांकडे अपील केले असून तेथे माझ्या बाजूने निश्चित निकाल लागेल.
– अनिल वाळुंज, सरपंच, पोंदेवाडी
मी कोणतेही अतिक्रमण केले नसून माझ्या मालकीच्या जमिनीच्या गटाची मोजणी होणे बाकी आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकृत निकाल मला अद्याप मिळालेला नाही. तो पाहून अपिलाबाबत निर्णय घेतला जाईल.
– बबन ढोबळे, सरपंच, पारगाव
पारगांव ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असून, त्याची सुनावणी होऊन ते सदस्यही अपात्र होण्याची शक्यता आहे.
– दीपक ढोबळे, पारगाव