आयुक्तांच्या अंदाजपत्रकात 3 कोटींची तरतूद
पुणे – महापालिकेच्या मुख्य इमारतीला आता अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी आयुक्तांच्या अंदाजपत्रकात सुमारे तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या या इमारतीची सुरक्षा रामभरोसे असून सुरक्षा रक्षक वगळता इतर कोणतीही यंत्रणा येथे नाही. त्यामुळे पहिल्यांदाच अशी तरतूद करण्यात आली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेच्या दोन मुख्य इमारती आहेत. त्यात एक जुनी, तर दुसरी विस्तारीत इमारत आहे. या दोन्ही इमारतींमध्ये दिवसाला जवळपास पाच ते सहा हजार नागरिक भेटी देतात. मात्र, इमारतींत कोठेही अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा नाही. वास्तविक प्रवेश करतानाच, आत येणाऱ्यांची आणि त्यांच्या साहित्यांची स्कॅनर तसेच इतर तत्सम साधनांद्वारे तपासणी आवश्यक आहे.
मात्र, यातील कोणतीही यंत्रणा नसल्याने केवळ नागरिकांना नाव लिहून घेऊन आत सोडले जाते. तसेच येणाऱ्या वाहनांचीही तपासणी होत नाही. त्यामुळे पार्किंगचा वापर बेकायदेशीरपणे केला जातो. यामुळे या दोन्ही इमारतींना धोका आहे. तर इमारतींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने केवळ सुरक्षा रक्षक नेमलेले असून त्यांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे ही तरतूद करण्यात आली आहे.