पिंपरी – घेईन जन्म मी याजसाठी देवा, तुझे चरणी सेवा साधावया….
देहूतून मार्गस्थ झालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शहरात दाखल होताच रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून दर्शन घेणाऱ्या शहरवासियांची जणू अशीच भावना असल्याचे चित्र रविवारी (दि. 11) होते. सायंकाळी साडे पाच वाजता निगडीत दाखल झालेला पालखी सोहळा आकुर्डीत सायंकाळी साडे सात वाजता विसावला.
आकुर्डीतील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान परिसरात सायंकाळी पालखीच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात भक्तीगीते, टाळ-मृदृंग वाजत असल्याने वातावरण भक्तीमय झाले होते. मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लहान मुले, वयोवृद्ध, तरूण-तरूणी आदीसह नागरिक संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. नागरिकांना दर्शन घेता यावे यासाठी मोठा एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. सायंकाळी साडे सात वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल होताच ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. पालखी विसाव्यानंतर थकलेल्या पायांना विसावा देण्यासाठी वारकऱ्यांचा समूह ठिकठिकाणी बसून भजनात दंग झाला. वारकऱ्यांची मुक्कामाची लगबग सुरू असताना परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. खेळणी, मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी झाली होती. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालखी सोहळा दाखल होताच परिसरातील रस्ते बंद करण्यात आले होते.
वारकऱ्यांची सेवा –
विविध सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी फळे, अन्नदान करून वारकऱ्यांची सेवा केली. बहुदेश राऊत यांनी स्वतः वारकऱ्यांना मोफत पाणी वाटले. या परिसरातील व्यावसायिकांनी अन्नदान आणि फळांचे वाटप केले.