शेगाव – श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती क्रिटिकल झाली आहे. मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे मागील तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती बीघडली आहे. शिवशंकरभाऊ यांच्यावर त्यांच्या राहत्या घरीच उपचारपद्धती चालू आहे.
मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका असे त्यांनी स्वत: सांगितल्यामुळे त्यांच्या राहत्या घरी पूर्ण मेडिकल सेटअपसहीत उपचार सुरू आहेत. शेगावमधील डॉ. हरीश सराफ हे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत.
शिवशंकर भाऊ पाटील यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आयुर्वेदिक उपचारालाच प्राधान्य दिले असल्याकारणाने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी बुलढाणा येथील आयुर्वेदतज्ञ डॉ. गजानन पडघान यांनाही त्यांच्या घरी बोलावण्यात आले आहे.
दरम्यान, समाज माध्यमांवर शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. यासंदर्भात हा संदेश चुकीचा असून, अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. भाविकांनी पॅनिक होवू नये, असे आवाहन त्यांच्या स्वकीयांकडून करण्यात येत आहे.