थोर समाजसुधार संत गाडगे बाबा यांची आज जयंती आहे. गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ झाला होता. गाडगेबाबा महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधारणा आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी | असे ते नेहमी सांगत असत. गोपाला गोपाला देवकिनंदन गोपाला हे भजन ते सातत्याने गात असत. ते दिन, दुबळ्या माणसांमध्ये देव पाहून त्यांची सेवा करत असत.
माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. दरम्यान, सध्या देशात सुरु असलेल्या अंधश्रद्धांमुळे गाडगेबाबांचे विचार सर्वांनी स्मरणात आणि आत्मसात करणे खुप गरजेचे आहे.
“संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश ”
गाडगेबाबा प्रबोधन काव्य
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!