संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुणे मुक्‍कामी

आनंदले वैष्णव गर्जती नामें। चौदाही भुवनें भरली परब्रह्में।।

पुणे – टाळ-मृदुंगाच्या ठेक्‍यावर वारकऱ्यांनी धरलेला फेर, मुखी “ज्ञानोबा…माऊली…तुकारामा’चा जयघोष आणि हाती भागवत धर्माची पताका घेऊन श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संतशिरोमणी तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या बुधवारी (दि. 26) पुण्यात विसावल्या. यावर्षीही वरूणराजाने दोन्ही पालख्यांच्या स्वागताला हजेरी लावली. त्यामुळे पालख्यांच्या स्वागतावेळी सारा शीण नाहीसा झाला.

उद्योगनगरी पिंपरी- चिंचवड शहरातून प्रस्थान ठेवलेल्या तुकाराम महाराजांची पालखी बुधवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी संगमवाडी पुलाजवळ येताच “जगद्‌गुरू तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करत पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर, गांधीवाड्यातून प्रस्थान ठेवलेल्या ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे संगमवाडी पुलावरून सायंकाळी साडेसहा वाजता “माऊली…माऊली…’चा जयघोष करत पाटील इस्टेट चौकात जल्लोषात आगमन झाले.

“तुज पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी ।
माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीराया ।। अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती.

यावेळी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी नगरसेवक आदित्य माळवे, दिलीप वेडेपाटील, सचिन दोडके यांसह महापालिका पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

यावर्षीही ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी पाऊण तास लवकर आली. गेल्या वर्षी सव्वासात वाजता माऊलींची पालखी पाटील इस्टेट चौकात आली होती. आळंदी ते पुणेपर्यंतचा रस्ता मोठा झाल्यामुळे आणि काटेकोर नियोजनामुळे यावर्षी पालखी लवकर आल्याचे विश्‍वस्तांकडून सांगण्यात आले. तर जगद्‌गुरू तुकाराम पालखीला पाटील इस्टेट चौकात येण्यासाठी अर्धा तास उशीर झाला. यावेळी पालखी मार्गावर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विश्‍वस्तांकडून स्वयंसेवकांचे कडे आणि पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते. संचेती चौकातून या दोन्ही पालख्या शिवाजीनगर, फर्गसन रस्त्याने ज्ञानेश्‍वर पादुका चौक आणि तुकाराम पादुका चौकात आल्या. त्याठिकाणी आरती झाल्यावर पालख्या खंडुजीबाबा चौकातून लकडी पुलावरून लक्ष्मी रस्त्याने मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झाल्या. तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात विसावली, तर ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावली.

Leave A Reply

Your email address will not be published.