मुंबई – बॉलिवूड स्टार संजय दत्तने आता क्रिकेटमध्ये एंट्री करण्याची तयारी केली आहे. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये फ्रँचायझी लीगची खूप क्रेझ आहे. दरम्यान,संजू बाबा 20 जुलैपासून झिम्बाब्वेमध्ये ‘झिम आफ्रो टी10’ स्पर्धा आयोजित करण्याची तयारी करत आहे.
या स्पर्धेत, प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त, एरीज ग्रुप ऑफ कंपनीजचे सर सोहन रॉय यांच्यासह हरारे हरिकेन्स नावाचा संघ विकत घेतला आहे आणि या फ्रँचायझीचे सह-मालक बनले आहेत. बॉलिवूड स्टार शाहरूख खान, प्रिती झिंटा यांच्यानंतर आता संजय दत्त देखील संघ मालक म्हणून लीग क्रिकेटच्या व्यवसायात उतरला आहे.
भारतात क्रिकेट हा खेळ खूप आवडीचा आहे यात शंका नाही. मग तो मोठा असो वा लहान, प्रत्येकजण या खेळाशी स्वतःला जोडतो. म्हणूनच आयपीएल हा भारतात एखाद्या सणासारखा साजरा केला जातो, ज्यामध्ये चाहते त्यांच्या संघांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतात. अभिनेता संजय दत्तनेही याला सहमती दर्शवत हा खेळ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा असल्याचे सांगितले आहे.
बॉलीवूड अभिनेता संजय दत्त म्हणाला, “क्रिकेट हा भारतातील धर्मासारखा आहे आणि सर्वात मोठ्या क्रीडा राष्ट्रांपैकी एक असल्याने, मला वाटते की हा खेळ जगाच्या कानाकोपऱ्यात नेणे हे आपले कर्तव्य आहे. झिम्बाब्वेचा खेळात मोठा इतिहास आहे आणि याच्याशी निगडीत राहणे आणि चाहत्यांना चांगला वेळ घालवण्यास मदत करणे ही मला खरोखरच आनंद देणारी गोष्ट आहे. , मी हरारे हरिकेन्सच्या जिम आफ्रो T10 मध्ये खरोखर चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.” संजय दत्तने हरारे हरिकेन्स खरेदी करण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.