नवी दिल्ली – दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आप नेते, राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीस जारी केली आहे.
संजय सिंह यांनी 4 नोव्हेंबर रोजी आपल्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी 20 ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.
त्यांची याचिका फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते की, संजय सिंह यांची अटक कायद्यानुसार आहे. ते कायद्याच्या वर नाही. प्राथमिक तपासात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. यानंतर संजय सिंह यांनी अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, मद्य घोटाळ्याप्रकरणी संजय सिंह यांना ईडीने 4 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, त्यात संजय सिंह यांच्यावर 80 लाख रुपयांच्या देणग्या घेतल्याचा आरोप आहे.