पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सचे अजेय सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांचची एक हॅट पॅरिसमध्ये झालेल्या लिलावामध्ये तब्बल 2 दशलक्ष युरोंना विकली गेली आहे. काळ्या रंगाच्या फेल्ट हॅटची विक्री तब्बल 1.932 युरो (2.1 दशलक्ष डॉलर)ना झाली. रविवारी पॅरिसमधील या लिलावामध्ये नेपोलियनच्या हॅटला मिळालेली ही विक्रमी किंमत होती. यापूर्वी 2014 मध्ये याच ठिकाणी झालेल्या लिलावात नेपोलियनच्या अशाच फेल्ट हॅटला 1.884 दशलक्ष डॉलर इतकी किंमत मिळाली होती.
नेपोलियनच्या या हॅटला त्याकाळी बिकॉर्न असे म्हटले जायचे. काळ्या रंगाच्या या हॅटवर फ्रान्सचा राष्ट्रध्वज निळा, पांढरा आणि लाल रंगामध्ये अ्ंकित केलेला होता. या हॅटच्या खरेदीसाठी जगभरातून खरेदीदारांनी उत्सुकता दाखवली होती. ही हॅट खरेदी करणाऱ्या व्यक्तीने या हॅटसाठी तब्बल 2 दशलक्ष डॉलर मोजले. लिलाव आयोजित करणाऱ्या आयोजकांनी मात्र या खरेदीदाराची ओळख गुप्त ठेवली आहे.
ही हॅट यापूर्वी जीन ल्युइस नौसिएझ या उद्योजकाकडे होती. त्यांचे गेल्या वर्षीच निधन झाले. त्यानंतर या हॅटचा लिलाव करण्याचे निश्चित झाले. या हॅटची अंदाजे विक्री किंमत 6 लाख ते 8 लाख युरो (6 लाख 56 हजार ते 8 लाख 73 हजार डॉलर) अशी निश्चित केली गेली होती. मात्र लिलावामध्ये मिळालेली किंमत या अपेक्षित किंमतीच्या दुपटीइतकी आणि राखीव किंमतीच्या चौपट आहे, असे लिलाव आयोजित करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे.
नेपोलियनकडे होत्या अशा 4120 हॅट
नेपोलियन यांच्याकडे अशा प्रकारच्या एकूण 4120 हॅट होत्या असे मानले जाते आहे. यापैकी बहुतेक आता हरवल्या आहेत. फ्रान्सचे राजेपद असताना कारकिर्दीच्या मध्यकाळात नेपोलियन अशाप्रकारच्या हॅट परिधान करत असायचे. त्यांच्या सम्राटपदाचा कार्यकाळ 1808 ते 1815 पर्यंत होता. ही हॅट घालणाऱ्या अन्य लोकांपेक्षा नपोलियन यांची ही हॅट परिधान करण्याची शैली थोडी वेगळी असायची. त्यामुळे त्यांची छबी थोडी वेगळी असायची. विशेषतः क्रांतीयुद्धाच्या काळात त्यांची ही शैली खूप प्रसिद्ध झाली होती.