मुंबई – हर्षा भोगले आणि रवींद्र जडेजा यांच्यावर अत्यंत विक्षिप्त शब्दांत टीका करणाऱ्या माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या करारबद्ध समालोचकांच्या पथकातून गच्छंती केली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे थेट प्रक्षेपण सुरू असताना मांजरेकर यांची टीका चाहत्यांनाही पसंत पडत नव्हती त्यासाठी सोशल मीडियावर मांजरेकर चांगलेच ट्रोल होत होते.
भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेतील धर्मशालातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, त्या सामन्यात समालोचकांच्या पथकात मांजरेकर उपस्थित नव्हते. मात्र, त्यामागचे खरे कारण कोणालाही समजले नव्हते. मात्र त्यानंतर करोनाच्या धोक्यामुळे या मालिकेतील उर्वरित सामने रद्द झाल्याने ही मालिका होणार नसल्याचे स्पष्ट करताना मंडळाने समालोचकांची यादी जाहीर केली होती व त्यात मांजरेकर यांचे नाव नव्हते, तेव्हा त्यांची मंडळाने गच्छंती केल्याचे समोर आले आहे.
समालोचकांच्या यादीत लिटील मास्टर सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन व मुरली कार्तिक यांचा समावेश असून त्यातून मांजरेकरांना बाहेर काढण्यात आले आहे. खेळाडूंच्या खेळाचे समीक्षण जरूर करावे. मात्र, त्यांच्यावर अत्यंत टोकाची टीका केली जाऊ नये हे साधे संकेतही मांजरेकर यांनी पाळले नाहीत, त्यामुळेच त्यांना बाहेर ठेवण्यात आले असल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले आहे.