मुंबई : आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमा दरम्यान म्हटले होते. परंतु, त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच ज्या कार्यक्रमात ते बोलले होते तो एक व्हिडीओही डिलीट केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणाले होते की,’आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी केलं होतं. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपाने केलेल्या तयारीचा उपयोग होईल.” असे मोठे वक्तव्य एका खासगी कार्यक्रमदरम्यान केले होते.’
त्यांच्या या विधानावर शिवसेना आमदार (शिंदे गट) संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण कुठला नेता काय म्हणतो त्याला काही महत्व नाही. आम्ही शिवसेना म्हणून 125 ते 130 जागा लढवणार असल्याचं वक्तव्य गायकवाड यांनी केल आहे.
ते पुढे म्हणाले,आमची युती ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वांसोबतचा विषय आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही 125 ते 130 जागा लढवणार आहोत असे गायकवाड म्हणाले. भाजप आमच्यापेक्षा मोठा पक्ष असल्यामुळे निश्चितच आमच्यापेक्षा थोड्याफार जागा ते जास्त लढतील. पण आम्ही शिवसेना म्हणून 125 ते 130 च्या खाली जागा लढणार नसल्याचे संजय गायकवाड म्हणाले आहे.