छत्रपती संभाजीनगर – कोण पालकमंत्री? संदीपान भुमरे हे केवळ 8 दिवस छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री राहतील, खोटे वाटत असेल तर लिहून घ्या, त्यांच्या मागे आतापर्यंत ईडी नव्हती. मात्र, आता लागेल असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी सर्व जण जमले होते. यावेळी बोलताना खैरे यांनी हा दावा केला आहे. यासाठी कारण काय आहे हे तुम्ही शोधा असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे सकाळपासून चर्चांना उधान आले आहे.
खैरे म्हणाले की, कोण पालकमंत्री? मी उन्हात उभा आहे, सुर्याच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने सांगतो, संदीपान भुमरे फक्त आठ दिवस पालकमंत्री राहणार आहेत. तुम्हाला खोटे वाटत असेल तर लिहून घ्या. त्याने सव्वा 2 कोटी रुपयांची गाडी घेतली. 12 दारूची दुकाने घेतली.
एकिकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला निर्व्यसनी होण्याचा सल्ला दिला. ज्या पैठणचे भूमरे हे आमदार आहेत, त्या संतांच्या भूमीत एकनाथ महाराजांनी व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले. तिथल्याच आमदाराने 12 दारुची दुकाने विकत घेतली आहेत. त्यामुळे लवकरच त्याच्यामागे ईडी लागणार असल्याचे भाकित चंद्रकांत खैरे यांनी वर्तवले आहे.
यापूर्वीही खैरेंचा दावा
शिंदे गटात गेलेले काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्या दाव्यानंतर आता संदीपान भुमरे काहीच दिवस पालकमंत्री राहतील असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. तर एकनाथ शिंदे मातोश्रीव जाऊन रडले, हे मला माहिती आहे. पालकमंत्री तेव्हा बिळात लपून बसले होते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.