पुणे – संभाजी विडीचं नाव बदलण्याचा निर्णय उत्पादक साबळे-वाघिरे ग्रुपने घेतला आहे. नाव बदलण्यासाठी ते कायदेशीर रजिस्टर करावे लागणार असल्याने याकरिता काही वेळ लागणार आहे. या कंपनीवर 60 ते 70 हजार विडी कामगाराचा प्रपंच अवलंबून असल्याचेही कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन विडीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे-वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून संभाजी विडीचे नाव बदलण्याची मागणी संभाजी ब्रिगेड आणि काही राजकीय संघटनांनी लावून धरली होती. याकरिता पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलनही सुरु केले होते त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून संभाजी विडीचं नाव बदलण्याचा निर्णय साबळे-वाघिरे कंपनीने घेतला आहे.