पुणे – चोरीच्या गुन्ह्यांत सराईत असलेल्या गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी अटक केली. हा चोरटा 1984 पासून गुन्हेगारीत असून आतापर्यंत त्याने 100 हून अधिक ठिकाणी हातसफाई केली.
राजू बाबूराव जावळकर (वय 55, रा. खानापूर, सिंहगड रोड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून ट्रक, टेम्पो व दुचाकी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणण्यात चंदननगर पोलिसांना यश आले.
चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही दिवसांपूर्वी टेम्पो चोरीला गेला होता. त्याचा सीसीटीव्हीवरून शोध घेत असताना पोलीस नाईक तुषार भीवरकर व शिपाई विक्रांत सासवडकर यांना जावळकर हा खेड शिवापूर टोलनाक्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला अटक केली. त्याकडे तपास केल्यावर त्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून वाहन चोरीच्या सात गुन्ह्यांची कबुली दिली.
ही कामगिरी निरीक्षक प्रकाश पासलकर, सहायक निरीक्षक गजानन जाधव, उपनिरीक्षक सचिन जाधव, हवालदार अजित धुमाळ, तुषार भीवरकर, श्रीकांत शेंडे, सुभाष आव्हाड, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, संदीप येळे, अतुल जाधव यांनी केली.
जावळकर हा 1984 पासून चोऱ्या करीत आहे. त्याने केलेले सुमारे 95 गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले. त्यातील काही गुन्ह्यांत त्याला शिक्षाही झाली. देशात लॉकडाऊन सुरू झाला त्याच दिवशी तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडला होता. अनलॉक सुरू होताच त्याने पुन्हा चोऱ्या सुरू केल्या.
शंकर खटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक