IPL 2024, Virat Kohli : पंजाब किंग्जविरुद्ध विराट कोहलीच्या शानदार खेळीनंतर, भारताचे माजी निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत यांनी त्याचे भरभरून कौतुक केले. 77 धावांची झंझावाती खेळी करताना कोहलीने सामन्याचा मार्ग बदलला. या शानदार खेळीत त्याने 49 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. याच जोरावर आरसीबीने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट्सने विजय नोंदवला.
श्रीकांतने केले विराट कोहलीचे जोरदार कौतुक…
श्रीकांत म्हणाले की, “विराट (कोहली) ज्या प्रकारे त्याची लय शोधतो, ज्या प्रकारे तो अस्सल क्रिकेटिंग शॉट्स खेळतो, त्यात कोणताही धोका नाही. गोलंदाजाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करण्यासाठी, तो क्रीजमधून बाहेर पडतो. यासह तो अनेक प्रकारचे शॉट्स खेळतो. या वयातही (35 वर्षे) तो विकेट्सच्या दरम्यान कसा धावा करतो ते पहा. तो जिथे एक धाव निघू शकते तिथे तो दोन धावा घेतो तर दोनच्या ठिकाणी तीन धावा घेतो. यामुळे, कालच्या सामन्यात संघाला सुमारे 15-20 धावा जादा मिळाल्या, ज्या शेवटी त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरल्या. विराट कोहलीला सलाम. तूला स्वतःला राजा म्हणवून घ्यायचे का नाही? तू तर खरच राजांचा राजा विराट कोहली आहेस.”
कोहलीमुळेच विजय….
दरम्यान, सुरुवातीच्या सामन्यात सीएसकेकडून पराभूत झाल्यानंतर आरसीबीला विजयाची नितांत गरज होती. 176 धावांचा पाठलाग करण्याची जबाबदारी कोहलीने आपल्या खांद्यावर घेत संघाला पुढे नेले. त्याच्या या शानदार खेळीमुळेच त्याच्या संघाला रोमहर्षक विजय मिळवता आला.
दरम्यान, विराट कोहली T20 मध्ये 100व्यांदा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात कोहलीने टी-20 मध्ये 12 हजार धावांचा आकडा गाठला होता.