बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याने त्याच्या करियरमधील सर्वांत मोठा ब्रेक घेतला आहे. याबाबत खुद्द सलमानने खुलासा करत सांगितले की, मागील 30 वर्षांच्या कारकिर्दीत मी आजपर्यत एवढा मोठा ब्रेक कधीही घेतला नव्हता.
पण करोनाच्या महामारीत करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मला ब्रेक घ्यावा लागला. “बिग बॉस-14’च्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत सलमाने हा खुलासा केला आहे. सलमान हा 3 ऑक्टोबरपासून “बिग बॉस’च्या आगामी सीजनचे होस्ट करणार आहे. सलमान म्हणाला, गेल्या सहा महिन्यांत काम न करणे माझ्यासाठी खूपच तणावपूर्ण राहिले आहे. मी गेल्या 30 वर्षांतही अशी सुट्टी घेतलेली नव्हती.
तथापि, मला हा ब्रेक जबरदस्तीने घ्यावा लागला आहे. यापूर्वी मी वर्षाच्या अखेरीस सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता “बिग बॉस’ शोमुळे ती रद्द करावी लागणार आहे.
दरम्यान, “बिग बॉस’च्या नवीन हंगामासाठी कमी मानधन घेतले असल्याचा खुलासा सलमानने केला आहे. करोनाच्या संकटकाळात चॅनेलवर कोणताही दबाव येऊ नये. तसेच प्रत्येक क्रू मेंबरला त्यांचा योग्य मोबदला मिळावा यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे.