सलमान खान आता वेगवेगळ्या पर्यायांमधून आपले सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. वेगळ्या प्रकारचे रोल करून झाल्यावर सलमानने आता चक्क हॉलिवूडचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. गेल्या शतकातील सर्वात मोठी फ्रॅन्चायजी असलेल्या इन्डियाना जोन्सच्या फ्रॅन्चायजीमध्ये सलमान झळकणार आहे. त्याच्या या नव्या सिनेमासाठी “इंडियाना जोन्स’चा आधार घेतला जाणार आहे, असे सलमानच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले आहे.
मात्र त्याच नात्र प्रत्यक्ष त्या सिनेमाचा काहीही संबंध असणार नाही. “इंडियाना…’च्या फ्रॅन्चायजीचा नायक असलेला हॅरिसन फोर्ड पुरातत्व शास्त्राचा प्राध्यापक म्हणून दाखवला गेला होता. मात्र सलमानच्या सिनेमामधे हिरोचा उद्योग काही तरी वेगळाच दाखवला जाणार आहे. याशिवाय सलमानने सिनेमातले अनेक संदर्भ बदलून टाकले आहेत.
“दबंग’, “टायगर’ आणि “वॉन्टेड’ सारख्या हिरोची छबी पुन्हा साकारण्याची सलमानची ईच्छा नाही. त्याला या रोलमध्ये दुहेरी व्यक्तिमत्वाचा रोल साकारायचा आहे. एक सर्वसामान्य व्यक्ती आणि दुसरा अत्यंत साहसी, डॅशिंग हिरो अशा दोन्ही रोलमध्ये सलमान स्वतःला बसवणार आहे. तीन सिनेमांच्या सिरीजपैकी पहिल्या सिनेमाचे शुटिंग पुढच्या वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. आमिर खानही सध्या हॉलिवूडमधील “फॉरेस्ट गम्प’चा हिंदी रिमेक “लालसिंग चढ्ढा’मध्ये काम करतो आहे.