बॉलिवूडचा दबंग अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खान सध्या नेटकऱ्यांच्या चांगलाच निशाण्यावर आला आहे. आधी नेपोटिझममुळे त्याच्यावर कडाडून टीका होत होती. त्यानंतर त्याने टाकलेल्या एका फोटोवरून सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतचे चाहते त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत.
सलमानने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जिममध्ये व्यायाम करत असतानाचा एक फोटो शेअर केला. सलमान खान त्याच्या पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. त्याची तीच ओळख पुन्हा एकदा अधोरेखित करणारा तो फोटो होता. त्यात त्याच्यापाठी जिममधली उपकरणंही दिसत होती. त्याच्यावर त्याने कॅप्शनही दिली होती. आताच व्यायाम पूर्ण केला आहे, असं त्याने फोटोखाली लिहिलं होतं.
तो फोटो पाहून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या चाहत्यांनी त्याला वाईट पद्धतीने ट्रोल करायला सुरुवात केली. यावेळी तू वाचणार नाहीस इथपासून ते या माणसाने न जाणो कित्येकांची करिअर उद्ध्वस्त केली आहेत, इथपर्यंत त्याला बोल लावण्यात आले.
काहींनी मर्यादा सोडूनही त्याच्यावर कमेंट केल्या आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधला घराणेशाहीचा वाद पुन्हा उफाळला असून अनेक मोठे सेलिब्रिटी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत.