गुणकारी, प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयोगी
पुणे – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध आजारांवर गुणकारी असलेले आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयोगी असलेल्या ड्रॅगन फळाला मागणी वाढली आहे. या फळाचा नुकताच हंगाम सुरू झाला असल्याने मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाव तेजीत आहेत. करोनामुळे या फळाला मागणी कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.
मधुमेह, रक्तदाब या आजारावर ड्रॅगन गुणकारी मानले जाते. तसेच, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे या फळाला बाजारात कायमच मागणी असते. मात्र, यावेळी कोरोनामुळे मागणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत दरातही 20 ते 30 टक्के वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी पाडुरंग सुपेकर यांनी दिली.
सुपेकर म्हणाले की, जून ते ऑक्टोबर हा ड्रॅगन फळाचा हंगाम असतो. मात्र, यंदा हंगाम उशीराने सुरू झाला आहे. सद्य:स्थितीत मार्केट यार्डातील फळ विभागात 200 ते 300 किलोची आवक होत आहे. ही आवक सोलापूर, पुणे, सातारा आणि नगर जिल्ह्यातून होत आहे. येत्या 15 दिवसांत आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हंगाम बहरात आल्यानंतर रोज 8 ते 10 टनापर्यंतची आवक होते. लाल आणि पांढरा अशा दोन प्रकारचे हे फळ असते. पांढऱ्या फळापेक्षा लाल फळाला अधिक मागणी असते. तसेच दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू येथूनही या फळाला मागणी असते. असेही सुपेकर यांनी सांगितले.