नवी दिल्ली – करोनानंतर सरलेले वर्ष वाहन क्षेत्रासाठी उत्साहवर्धक ठरले आहे. या वर्षांमध्ये वितरकांनी ग्राहकांना विकलेल्या वाहनात म्हणजे रिटेल वाहन विक्रीत 15% ची वाढ होऊन या वर्षात 2.11 कोटी वाहनांची विक्री झाली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर असोसिएशन या वितरकांच्या संघटनेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या वर्षी 1.83 कोटी वाहनांची विक्री झाली होती. या वर्षात दुचाकीची विक्री 13 टक्क्यांनी वाढून 1.53 कोटी इतकी झाली आहे.
प्रवासी वाहनांची विक्री 34.31 लाख इतकी झाली आहे. गेल्या वर्षी 29.49 लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. प्रवासी वाहनांची विक्री वाढत आहे. मात्र दुचाकी वाहनांची विक्री अपेक्षेइतकी होत नसल्याचे या संघटनेचे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले. सरलेल्या वर्षात व्यावसायिक वाहनांची विक्री 31 टक्क्यांनी वाढून 8 लाख 65 हजार इतकी झाली आहे.
तीन चाकी वाहनांची विक्री वेगात वाढत असून सरलेल्या वर्षांमध्ये 71 टक्क्याची वाढ होऊन 6 लाख 40 हजार तीन चाकी वाहने विकली गेली. मात्र ग्रामीण भागातील क्रयशक्ती अजूनही वाढलेली नाही. महागाई वाढत आहे त्याचबरोबर इंधनाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे ही वाहन विक्री वाढत नसल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात येते.