माजी खासदार गजानन बाबर यांची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सरकारी कार्यालयांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेफ्टी ऑडिट करण्यात यावे. तसेच, संकटकाळासाठी कर्मचाऱ्यांना बचाव प्रशिक्षण देण्यात यावे. त्यामुळे अधिकारी वर्ग व नागरिक सुरक्षित राहतील, अशी भूमिका माजी खासदार गजानन बाबर यांनी घेतली आहे.
त्यांनी याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या समवेत पत्रव्यवहार केला आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे शहरांमध्ये असलेल्या सरकारी कार्यालयांमध्ये दररोज नागरिकांची वर्दळ असते. मंत्रालयासारख्या कार्यालयाला आग लागण्याचा प्रकार यापूर्वी घडलेला आहे. आगीच्या घटनेमध्ये वित्तहानी, कागदपत्र नष्ट होणे तसेच जीवितहानी होण्याचाही संभव असतो.
दोन्ही पालिका तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालये, एमआयडीसी, एलआयसी, पोलीस आयुक्त कार्यालय, पीएफ, महावितरण, विविध विमा कार्यालये, पासपोर्ट कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, शिधापत्रिका कार्यालय, सहकारी संस्थांची कार्यालये, साखर संकुल, न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय अशी विविध सरकारी कार्यालये, त्याशिवाय, शहरातील बसस्थानके, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, ससून रुग्णालय आदींचे सेफ्टी ऑडिट होणे गरजेचे आहे. सध्या काही सरकारी कार्यालयांना दुसरे प्रवेशद्वार नाही.
त्यामुळे आग लागल्यास अधिकारी किंवा नागरिक दुसऱ्या मार्गाने कसे जाणार याचाही प्रश्न उद्भवतो. काही ठिकाणी आग लागल्यास फायर एक्सटींग्विशर बसवले. गेलेले नाहीत. फायर फायटिंग सिस्टीम योग्य पद्धतीने चालते आहे की नाही, याची वेळोवेळी खातरजमा करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कार्यालयांमध्ये आग लागल्यास सिलिंगला स्प्रिंकल व्यवस्था आहे की नाही हे देखील पाहणे गरजेचे आहे. वेळोवेळी मॉकड्रील घ्यायला हवे.