पिंपरी, (प्रतिनिधी) – राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सरकारी कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांचे सेफ्टी ऑडिट करण्यात यावे. तसेच कार्यालयाबाहेर सेफ्टी व फायर ऑडिट झाल्याचे प्रमाणपत्र लावण्यात यावे. अशी मागणी कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सुरज गजानन बाबर यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत बाबर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी ४ ते ११ मार्च हा “राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह” पाळला जातो. या कालावधीमध्ये औद्योगिक, पर्यावरण, ऊर्जा व वाहतूक, याबाबतीत जनजागृती करण्यात यावी. शक्य असेल तिथे प्रात्याक्षिक (मॉकड्रिल) घ्यावे, जेणेकरून नागरिकांमध्ये जनजागृती होऊन आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, कशाप्रकारे परिस्थिती हाताळावी, याची माहिती होईल. त्यामुळे कोणतीही अनुचित दुर्घटना व स्थावर मालमत्तेची हानी होणार नाही.
शहरातील सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालय, एमआयडीसी, एलआयसी कार्यालय, वायसीएम हॉस्पिटल, पोलीस ठाणे, पीएफ ऑफिस, महावितरणचे कार्यालय, विविध विमा कार्यालय, पासपोर्ट ऑफिस, शहरातील बसस्थानके,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय, रेशनिंग ऑफिस, सहकारी संस्थांचे ऑफिसेस, साखर संकुल, न्यायालय, जिल्हाधिकारी, तहसील, विभागीय आयुक्त कार्यालय, ससून, वायसीएम, औंध यासारखी मोठमोठी हॉस्पिटल्स, रेल्वे कार्यालय तसेच सर्व शाळा व कॉलेजेस यांच्यापैकी काही कार्यालयांना दुसरे एक्झीटस नाही.
त्यामुळे आग लागल्यास अधिकारी, नागरिक दुसऱ्या मार्गाने कसे जाणार? याचाही प्रश्न उद्भवतो.फायर एक्सटींग्विषर बसवले गेले नाहीत, फायर फायटिंग सिस्टीम योग्य चालते की नाही, याची वेळोवेळी खातरजमा करणे गरजेचे आहे. आग प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित प्रश्न असल्याकारणाने सर्व कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांबरोबरच नागरिकांनाही वेळोवेळी सेफ्टी ऑडिट व संकटकाळी बचाव प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.