लंडन – अध्यात्मिक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी माती वाचवा या मोहिमेअंतर्गत जनजागृतीसाठी 100 दिवसांचा प्रवास मोटारसायकलवरून करण्याचे ठरवले असून कालपासून त्यांच्या या मोहिमेला लंडनमधून सुरूवात झाली. या कालावधीत ते युरोपातील आणि पश्चिम आशियातील 27 देशांना भेट देऊन माती वाचवण्याबाबत त्या देशातील धोरणकर्ते, पर्यावरण तज्ज्ञ, प्रभावी व्यक्ती, सेलिब्रिटीबरोबर संवाद साधणार आहेत. देशातील मातीचा कस वाढवण्यासाठी धोरण निश्चित करावे असा आग्रह सद्गुरू प्रत्येक देशाच्या नेत्यांकडे धरणार आहेत.
मातीचा कस वाढवण्याला प्राधान्य द्यावे यासाठी ते प्रत्येक देशातील धोरणकर्त्यांकडे आग्रह धरणार आहेत. संयुक्त राष्ट्रांमधील तज्ज्ञांच्या मते जगभरातील एक तृतीयांश माती निकृष्ट झालेली आहे आणि 90 टक्के माती 2050 पर्यंत निकृष्ट झालेली असेल. पृथ्वीवर मातीचा पाच सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी एक हजार वर्षांचा कालावधी लागतो.
सदगुरुंची माती वाचवा मोहिम लंडनमधील ईशा योगा सेंटरपासून रविवारी सुरु झाली. त्यावेळी अनेक स्वयंसेवक आणि नागरिक उपस्थित होते. त्यांना घोषणा देऊन, टाळ्या वाजवून, गाणी म्हणून सद्गुरुंच्या कार्याला प्रोत्साहन दिले. मोहिमेची सुरवात करताना सद्गुरू म्हणाले की, आम्ही माती वाचवा या मोहिमेवर गेली दोन वर्षे काम करत असून या विषयावर जागतिक पातळीवर जनजागृती होण्याच्या दृष्टीने गेल्या आठ महिन्यात विविध देशांमधील मंत्र्यांना आणि नेत्यांना भेटून जागतिक पातळीवर सहमती घडवून माती वाचवण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम केला जावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
या चळवळीतून 192 देशांमध्ये यासंदर्भातील धोरण निश्चित केले जावे असा प्रयत्न असल्याचे सद्गरुंनी सांगितले आहे. या कामासाठी सगळ्यांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, मी काही वैज्ञानिक नाही. मी पर्यावरणवादी आहे. मी जमिनीशी नाते असलेला माणूस आहे. प्रयोगशाळेशी नव्हे. पण मला मातीची काय अवस्था झाली आहे हे माहिती आहे. त्यामुळेच मी विविध देशांचे प्रमुख, मंत्री, नेते, वैज्ञानिक यांच्या गाठीभेटी घेत आहे.
64 वर्षांचे सद्गुरू यांच्या या मोहिमेत जागोजागी कोलंबियातील गायक-गीतकार मलुमा, इंग्लंडचा रग्बी खेळाडू जॉनी विल्किन्सन, जर्मनीचा फुटबॉल खेळाडू मायकेल बलॅक हे सहभागी होणार आहेत. या प्रवासात ते विविध रेडिओ आणि टीव्ही स्टुडिओला भेट देऊन मुलाखती, चर्चांमध्ये सहभागी होणार आहेत. सुमारे साडेतीन अब्ज लोकसंख्येशी संपर्क साधण्यासाठी आम्ही मोटारसायकल आणि संगीताची मदत घेतली आहे असे ते सांगतात.