पुणे – सदाशिव पेठेतील औषधगल्ली पुन्हा जोमात सुरू झाली आहे. येथील एका दुकानातील कर्मचारी, मालक आणि त्या सगळ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील सुमारे 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, या प्रकारानंतर पुणे केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस ही बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बाजारपेठ सोमवारी सुरू करण्यात आली.
सदाशिव पेठ, नारायणपेठ आणि शनिवार पेठ या भागामध्ये आतापर्यंत करोना लागण झाली नव्हती. पण, तेथे औषध घेण्यासाठी आलेल्या ग्राहकापासून झालेली बाधा ही कर्मचारी, आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. यात बिबवेवाडीतील कामगाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या संपर्कातील 70 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 37 जणांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. आणखी सात जणांचा अहवाल येणे बाकी आहे.
सुरूवातीपासूनच योग्य ती काळजी घेतली होती. मात्र, अनवधानाने आमच्यातील काहींना संसर्ग झाला. यातून बाहेर पडून सेवा सुरू करणे गरजेचे होते. त्यानुसार बाजारपेठ पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यापुढे संपूर्ण काळजी घेऊन सर्व व्यवहार करण्यात येतील. करोना रुग्ण सापडलेली तीनही दुकाने बंद आहेत.
– विजय चंगेडिया, सचिव, केमिस्ट असोसिएशन