मुंबई – प्रभादेवीमध्ये गणेशोत्सवादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाल्यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच बलेस्टिक चाचणीत पिस्तूलातून गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले होते. पण आता पिस्तूलातून सरवणकरांनी गोळी झाडली नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले आहेत. त्यामुळे सरवणकरांना याप्रकरणी एकप्रकारे क्लिनचिट मिळाली आहे.
दादरच्या प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. त्यातून उफाळलेल्या वादातून शिंदे गटाचे आमदार सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सरवणकरांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येते होती.
त्यानंतर या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तसेच ही पिस्तूल सरवणकरांचीच असल्याने ती जप्त करण्यात आली होती. दरम्यान पिस्तूलची बलेस्टिक चाचणीही करण्यात आली. त्यात पिस्तूलातून गोळीबार झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते.