मुंबई : खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलत होते.
सांगली जिल्ह्यात शेतकरी रासायनिक खत खरेदी करत असताना ऑनलाईन माहिती भरली जात आहे. यामध्ये जातीचा उल्लेख आहे हे डीबीटी पोर्टल केंद्र शासनाचे असून जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
दरम्यान, अहो, शेतकरी हीच आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय? असा संतप्त सवाल आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातिवाद निर्माण करणार्या सरकारला खडेबोल सुनावले.
#MahaBudget2003 : जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? अजित पवारांचा संतप्त सवाल
तसेच ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रकाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागत असून जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये, असेही अजित पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.