कोल्हापूर – परप्रांतिय महिलेने सात महिन्याच्या मुलासह राहत्या घरी साडीने गळफास गेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी सव्वासात वाजता ही घटना उघडकीस आली. कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीच्या मेट्रो टेक्स्टाईल पार्कमधील कामगार चाळीत ही घटना घडली आहे.
ओडिसा येथील लक्ष्मीधर भगवान मरंडी मेट्रो टेक्स्टाईल पार्क मधील सुत गिरणीत कामाला होता. या मिलच्या शेजारीच कामगारांना राहण्यासाठी खोल्या बांधण्यात आल्या आहेत. यातील एका खोलीत लक्ष्मीधर आपली पत्नी संबारी (वय 24) आणि मुलगा भगवान (वय 7 महिने) यांच्यासह राहत होता. रात्री अकरा वाजता रात्रपाळी असल्याने तो सुत गिरणीत कामावर गेला होता.
सकाळी सव्वासात वाजता तो कामावरून घरी परत आला. घराचा दरवाजाचा आतून बंद असल्याने तो उघडण्यासाठी लक्ष्मीधर याने पत्नीला हाक मारली. मात्र आतून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांने शेजारील कामगारांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला. घरात गेल्यानंतर त्याला पत्नी संभारीने मुलासह साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची माहिती कागल आणि गोकुळशिरगांव पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविले. लक्ष्मीधर गेल्या दिड दोन महिन्यापासून मेट्रो स्पिनिंग मिलमध्ये कामाला आहे . त्याच्या पत्नीच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.