मुंबई – मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’ यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या सहा प्रयोगांची मालिका मंगळवार, दि. 14 मार्चपासून रविवार, दि. 19 मार्च या कालावधीत रोज सायंकाळी 6.45 वा. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे सुरु आहे.
‘जाणता राजा’च्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचे प्रेरणादायी महापर्व सध्या सर्वांना अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे सध्या शिवाजी पार्क मैदानावर छत्रपतींची गौरव गाथा असणाऱ्या ‘जाणता राजा’चा नाद घुमत आहे.
भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग आयोजित केले असून त्यानिमित्तानं शनिवारी भारतरत्न ‘सचिन तेंडुलकर’ उपस्थित होता. रोज या प्रयोगाची सुरुवात तुळजाभवानीच्या आरतीने होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिली आरती करुन प्रयोगांच्या मालिकेला सुरुवात झाली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गायिका उषा मंगेशकर आदींनी हजेरी लावली.
दरम्यान, यावेळी सचिन तेंडुलकरने आरती करुन प्रयोगाला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सचिनने सर्वांचे आभार मानले. “शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्याने आणि माझ्या क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली,” अशा शब्दांत सचिन तेंडुलकर याने भावना व्यक्त केल्या.