पुणे -सध्या अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यातच उन्हाच्या झळा वाढत असल्याने प्रामुख्याने घरगुती वीजवापराचे प्रमाण वाढणार आहे. या कालावधीमधील नियंत्रित बिलासाठी वीजवापराकडे लक्ष ठेवावे व मीटर रीडिंगची दररोज पाहणी करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. त्यामुळे वीज बिलांवरून होणारे वाद टाळण्यास मदत होणार आहे.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या संचारबंदी असल्याने बहुतांश नागरिक घरातच आहे. कार्यालयीन कामे देखील घरातूनच सुरु आहे. दुसरीकडे उन्हाच्या झळा वाढत आहेत.
त्यामुळे घरातील पंखे, एसी, कुलर, टिव्ही, संगणक किंवा लॅपटॉप आदी उपकरणांचा वापर वाढणार आहे. पर्यायाने विजेचा वापर सुद्धा वाढणार आहे. या उपकरणांचा अनावश्यक वापर टाळावा व वीजवापराकडे लक्ष ठेवावे. यासाठी मीटरमधील केडब्लूएच रीडिंगची दररोज पाहणी करता येईल.
लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व पब्लिक सर्व्हिसेस वर्गवारीच्या ग्राहकांना संभाव्य वीजबिलाची पडताळणी ही महावितरण मोबाइल ऍप व ुुु.ारहरवळीलो.ळप या वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे.
मागील वर्षीच्या लॉकडाऊन काळात अनेक जण घरूनच काम करत होते. त्यावेळी विजेचा वापर वाढला. त्यात तीन महिन्यांचे बिल एकत्र आले. त्यामुळे अनेक ग्राहकांनी महावितरणकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे यंदा वीज जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे.
असे वाढू शकते बिल
जे ग्राहक दरमहा 80 ते 90 युनिट किंवा 280 ते 290 युनिट वीजवापर करतात, त्यांचा वीजवापर वर्क फ्रॉम होम आणि वाढत्या उन्हामुळे साधारणतः अनुक्रमे 100 किंवा 300 युनिटपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्लॅबपुढील युनिटला दुसऱ्या स्लॅबचा दर लागणार आहे. घरगुती विजेचा वापरासाठी 1 एप्रिल 2021 पासून नवीन वीजदर लागू झाले आहेत. वहन दर प्रतियुनिट 1 रुपये 38 पैशांसह स्लॅबनुसार शून्य ते 100 युनिट- 3 रुपये 44 पैसे, 101 ते 300 युनिट- 7 रुपये 34 पैसे, 301 ते 500 युनिट- 10 रुपये 36 पैसे, 500 युनिटपेक्षा अधिक वीजवापरासाठी 11 रुपये 82 पैसे असे दर आहेत.