नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धेत 2013 साली मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्याने लावण्यात आलेल्या बंदीचा कालावधी संपल्याने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत पुन्हा मैदानावर परतला आहे.
येत्या 10 तारखेपासून सुरु होत असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत तो केरळसंघाकडून खेळणार आहे. मात्र, त्याच्या वर्तनात अद्याप बदल झालेला नसल्याचे समोर आले आहे. मुश्ताक अली स्पर्धेपूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात त्यानेआपल्या एका सहकारी खेळाडूला स्लेजिंग केल्याने तो पुन्हा चर्चेत आला आहे.
मुंबईत होणाऱ्या या स्पर्धेतील सामन्यापूर्वी श्रीशांतने सराव सामन्यात गोलंदाजी केली. श्रीशांत आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. चेंडू टाकल्यानंतर तो फलंदाजाला काहीतरी डीवचतच असे. त्याचा हाच आक्रस्ताळेस्वभाव आजही कायम असल्याचे सराव सामन्यात सिद्ध झाले आहे.
केरळ संघाच्या सर्व संभाव्य खेळाडूंदरम्यान एक सराव सामना खेळला गेला. त्यात आपल्याच सहकारी खेळाडूला उद्देशून त्याने स्लेजिंग केले. त्याच्या या गैरवर्तनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला. आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी बीसीसीआयने श्रीशांतवर बंदी घातली होती. त्याची बंदी सप्टेंबर 2020 मध्ये संपली.