मॉस्को :- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार नाहीत. पुतिन यांनी याबद्दल सांगितले की, रशियामध्ये राहणे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.
दरम्यान, पुतिन व्हिडिओ लिंकद्वारे ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार असून रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी 19 जुलै रोजी सांगितले की, पुतीन ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत येणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचे प्रवक्ते व्हिन्सेंट मॅग्वेनिया यांनी माहिती देताना सांगितले की, परस्पर सहमतीनंतर अध्यक्ष पुतिन परिषदेत सहभागी होणार नाहीत. पुतिन यांचे सप्टेंबरमध्ये भारतात येणेही अवघड दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. युक्रेनमध्ये युद्धगुन्हे, मुलांचे बेकायदेशीर विस्थापन आणि लोकांचे बेकायदेशीर स्थलांतर या आरोपाखाली पुतिन यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. अशा स्थितीत रशिया सोडल्यास पुतिन यांना अटक होण्याचा धोका आहे. पुतीनना अटक करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेवर आंतरराष्ट्रीय दबावही वाढत होता.
दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक अलायन्स देखील पुतिन यांना अटक करण्यासाठी सरकारवर दबाव आणत असून याबाबत न्यायालयातही गेले आहे. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी एक निवेदन जारी करून पुतीन यांना ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी अटक करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
पुतीन यांना दक्षिण आफ्रिकेत येऊन ब्रिक्स शिखर परिषद धोक्यात घालायची नाही. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या समस्या वाढवण्याची त्यांची इच्छा नाही, असे राजनैतिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, पुतीन यांचा भारत दौराही संशयास्पद आहे.