पुणे – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ‘रुपाली चाकणकर’ यांचा मुलगा ‘सोहम चाकणकर’ लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. सोहम चाकणकर हा आगामी ‘तू आणि मी, मी आणि तू’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती राजू तोडसाम, ऋषभ कोठारी व सागर जैन यांनी जैन फिल्म प्रॉडक्शन बॅनरअंतर्गत केली. तर कपिल जोंधळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
‘तू आणि मी, मी आणि तू’ हा एक रोमँटिक चित्रपट असून, सोहम यामध्ये गणेश नावाच्या समंजस आणि होतकरू मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सोहम व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार असणार आहेत. हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मुलगा सोहम याच्या नवीन प्रवासा बद्दल रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘सर्वप्रथम मी असं सांगेन की सोहमला मिळालेल्या या संधीमागे पूर्णतः त्याचं श्रेय आहे. माझा यात काहीच वाटा नाही. उलट त्याचा हा निर्णय ऐकून मी आश्चर्यचकित झाले. माझ्यासाठी खरंच अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्याने निवडलेल्या या क्षेत्रात तो स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करेलं.’ असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.